Sunday, 7 August 2016

लोकलयातना आणि बेरकी प्रशासन





मुंबईकर लोकल प्रवासी आणि लोकल यांचं एक अतूट नातं आहे. धकाधकीच्या जीवनात ट्रैफिक मध्ये न अडकणारी मुंबईची लाइफलाईन म्हणून लोकल ट्रेनची ओळख आहे. अशा या मुंबईच्या लाइफलाईन ला फार जुना इतिहास आहे. भारतात (१८५३ साली) किंबहुना आशिया खंडात पहिली धावणारी ट्रेन म्हणून मुंबईच्या लोकलला मान मिळाला. मुंबईमध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या स्वरुपात लोकल ट्रेनचे जाळे पसरले आहे. जागेअभावी मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडील उपनगरांच्या रुपात वाढत गेली पण त्या प्रमाणात व्यापारी कार्यालये, संस्था, विविध प्रकल्प यांचं स्थलांतर झालं नाही आणि एक मोठा प्रवासी वर्ग दक्षिण मुंबईकडे प्रवास करू लागला. मधल्या काळात रोजीरोटीसाठी येणाऱ्या परप्रांतीयांमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि मुंबईच्या या लाइफलाईन वर गर्दीचा ताण वाढू लागला.

पण मुंबईकर लोकल प्रवाशांना त्यांचा वाली आहेच कुठे? त्यांना लोकलमधील अडी-अडचणी, हालअपेष्ठा, मुंगी जायलाही वाव नसणाऱ्या गर्दीतून आणि बहुतेक वेळा पंखे बंद असूनही प्रचंड उकाड्यात प्रवास करण्याची सवय झाली आहे असं नाही तर नाईलाजास्तव प्रवास करावा लागतो आहे. अती गर्दीमुळे लोकल डब्यात शिवीगाळ, भांडणे, मारामारी इ. गोष्टी सहज घडू लागल्या आहेत. मुंबईकर प्रवासी रोजच लोकल ट्रेनने सकाळी ७ ते ११ तसेच संध्याकाळी ६ ते ९.३० मध्ये प्रवास करून मरण यातना भोगत आहे. या वेळेत तुम्ही मध्य, पश्चिम अथवा हार्बर लाईनवरील कोणतेही स्टेशन गाठा आणि प्रवाशांची अवस्था पहा. गुराढोरांसारखे एकमेकांना धक्काबुक्की करत प्रत्येकजण आत जाण्याचा किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. दरवाजा अडवून उभे राहणाऱ्या हुल्लडबाज आणि अडेल-तट्टू प्रवाशांमुळे तर जास्तच गोंधळ उडतो. अशा वेळी माणुसकीची, संवेदनेची धार बोथट झालेली असते. लहान मुले असो वा वृध्द व्यक्ती किंवा रुग्ण, कोणीही यातून सुटत नाही. 

दरवर्षी रेल्वेचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो आणि मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. उपनगरी प्रवाश्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली आहे. आजवर मांडलेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पातील किती बाबींची पूर्तता झाली हा संशोधनाचा विषय आहे. मुंबईतील कोणताही राजकीय नेता कधीच लोकल ट्रेनने नियमित प्रवास करत नाही, त्यांना प्रवाशांच्या नरकयातना कशा कळणार? मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने मोठा गाजावाजा करत १५ डब्यांच्या लोकलची घोषणा केली होती. त्यासाठी जवळ जवळ सर्वच स्थानकांचे फलाट वाढवले गेले. पण योजनेचा पुरता बोजवारा उडाला आणि १५ डब्याची लोकल क्वचितच धावली. प्रवाशांनी १५ डब्यांची कधीच मागणी केली नव्हती, पण आहे त्या १२ डब्यांच्या लोकल तरी नियमित असाव्यात, जेणेकरून गर्दीवर थोडेफार नियंत्रण राहु शकते. कारण परीस्थिती अशी आहे कि, २-३ मिनिटे जरी लोकल उशीरा आली तरी सुद्धा प्लेटफॉर्म गर्दीने फुलून जातो.

पावसाळयात तर चाकरमान्यांचे हाल बघवत नाही. थोड्याशा पावसात सुद्धा अमुक तमुक लोकल मध्ये, इंजिन मध्ये किंवा सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड होणे नित्यनेमाचे होते. मेगा ब्लॉकची सवय असलेल्या मुंबईकर प्रवाशांना तासनतास तिष्ठत बसून वाट पाहण्याशिवाय आणि रेल्वे प्रशासनाच्या नावाने खडे फोडण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. अर्थातच प्रवाशांच्या या लुळ्या पांगळ्या रागाचा बेरकी प्रशासनावर काही फरक पडत नाही. बरं, ज्या फलाटावर प्रवासी वाट बघत असतात तिथली अवस्था सुद्धा अत्यंत दयनीय. कुठे छप्पर तुटून पाणी गळतंय तर कुठे पंखे बंद, कुठे बाकडे तुटलेले तर कुठे इंडिकेटर बंद. कित्येक स्थानकांवर तर अजूनही मुबलक स्वच्छतागृहे नाहीत. स्वच्छतागृहाची उपलब्धता आणि ठिकाणासाठीचा काय निकष लावला जातो हा तर यक्ष प्रश्न आहे.

सुमारे ६० लाख लोक दररोज लोकलने प्रवास करतात. या ६० लाख लोकांच्या सुरक्षेची व्यवस्था राम भरोसे आहे. बहुसंख्य स्थानकांवर बसवलेले मेटल डिटेक्टर बंदच आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो का? कॅगच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात मुंबई लोकल रेल्वेच्या हद्दीत १७ हजार ६३८ प्रवाशांना जीव गमवावा लागला. होय, बरोबर वाचले तुम्ही.. १७ हजार ६३८. यामध्ये, गर्दीमुळे लोकलच्या डब्यातून पडून ४००२ प्रवाशांचा मृत्यू झाला. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ च्या दरम्यान ३३०४ प्रवासी तर २०१६ या वर्षी जूनपर्यंत १४०० प्रवासी जीवाला मुकले. काय वाटतं हि आकडेवारी पाहून? कुठे घेवून चालली आहे आपल्याला हि कथित लाइफलाईन? मृत्यूच्या दाढेत बसून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा तर सापळा आहे. एखाद्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडणाऱ्या आकड्यापेक्षा हा आकडा कितीतरी पटीने मोठा आहे.

(ठाणे स्टेशनला कल्याणच्या बाजूने प्लेटफॉर्मला जोडणारा पूल नसल्याने हजारो लोक दररोज जीवघेणी क्रॉसिंग करत आहेत.)

सुस्त आणि निगरगठ्ठ रेल्वे प्रशासनाच्या नजरेत प्रवाश्यांच्या जीवाला काही किंमतच उरलेली नाही. एखाद्या प्रवाशाचा मृतदेह पटरीवर पडला असेल तर तो उचलला जात नाही तोपर्यंत त्याच्यावरून लोकल जातच राहतात. हा तर असंवेदनशीलतेचा कळस झाला. उनाड प्रवाशांच्या स्टंट मुळे ओढवणारे मृत्यू.. गाडीच्या टपावरून जीवघेणा प्रवास करताना होणारे मृत्यू.. प्रचंड गर्दीमुळे हात निसटल्याने डब्यातून पडून होणारे मृत्यू.. क्रॉसिंग करताना होणारे मृत्यू.. अपघातात जखमी प्रवाशाला रुग्णवाहिकेअभावी तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्याने होणारे मृत्यू.. या आणि अशा अनेक बाबींवर ठोस उपाय योजना केल्यास लोकलमृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी होईल. मुंबई आणि उपनगरातील बहुसंख्य धोकादायक फलाटांची उंची वाढवण्याचे काम अजूनही प्रलंबित असून ती एक चिंताजनक बाब आहे. 
इतक्या गंभीर प्रश्नावर आजतागायत कानाडोळा करण्यात आला असून प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे.

रेल्वे प्रशासनाने जमीनी स्तरावर सर्वेक्षण करावे आणि लोकल प्रवाश्यांच्या समस्या, सूचना, तक्रारींची गंभीरतेने दखल घ्यावी. प्रवाश्यांच्या हालअपेष्ठा कमी करून प्रवास सुखकर कसा होईल याची साधक बाधक चर्चा करावी. प्रशासनच्या नियमानुसार क्रॉसिंग करणे जर गुन्हा असेल तर अनेक ठिकाणी पूल नसल्यामुळे प्रवाशांना, नागरिकांना क्रॉसिंग करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल तसेच फलाट आणि रेल्वेच्या मधील जागेत पडून प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून रेल्वे प्रशासनावर हत्येचा गुन्हा का नोंदवू नये? दररोज किमान १० प्रवाशांना गिळूनही ढेकर न देणाऱ्या रेल्वे प्रशासनाला यावर ठोस उपाय योजना कराव्याच लागतील. 

No comments:

Post a Comment